राष्ट्रीय सेवा योजना
राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयातील एक अत्यंत महत्त्वाचा विभाग असतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये श्रमसंस्कार रुजविण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी, उद्याचे आदर्श नागरिक घडविण्यासाठी व त्यांच्या मनामध्ये सामाजिक एकता व राष्ट्रप्रेमाची पेरणी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला समजून घेणे, समाजाच्या गरजांची माहिती करून घेणे, त्या दूर करणे, स्वत:ला व समाजाला सक्षम बनवणे, नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तीचा विकास करणे, समाजातील गरीब वर्गाची सेवा करण्याची इच्छा जागृत करणे अशा विविध उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्य करते. एकूणच विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करून त्याला समाजाभिमुख करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राष्ट्रीय सेवा योजना विभाग करीत असतो. राष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 24 सप्टेंबर 1969 रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्थापना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत करण्यात आली.
शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व महाविद्यालयाला समाजाशी जोडण्यासाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवण्यात येतात. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामध्ये सध्या एकूण तीन युनीट कार्यरत असून त्यामध्ये 275 स्वयंसेवकांना प्रवेश दिला जातो. त्यासोबतच कार्यक्रमाधिकारी या सर्व कार्याचे संयोजन करत असतात. त्यामध्ये सध्या डॉ.एस.व्ही. शिंदे, डॉ.ए.एस. टेकाळे व प्रा.बी.पी. सूर्यवंशी कार्यभार पाहत आहेत.
महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग दोन पातळीवर कार्य करत असतो. नियमित कार्यक्रम व विशेष वार्षिक युवक नेतृत्व शिबीर नियमित कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विविध व्याख्याने व कार्यक्रम, विविध विषयावर जाणीवजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्यविषयक कार्यक्रम व शिबीर, मतदानाविषयी जागृती असे वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येतात. तर विशेष वार्षिक युवक नेतृत्व शिबीरांतर्गत विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने ग्रामस्वच्छता, जलसंधारण, वृक्षारोपण, ग्रामसर्व्हे, रस्तेदुरूस्ती, शोषखड्डे, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर इत्यादीसोबतच विविध विषयांवर बौद्धिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून महाविद्यालयाच्या रा.से.यो. विभागाकडून मौजे बामणी ता.उदगीर हे गाव विविध सेवाकार्यासाठी दत्तक घेण्यात आले आहे. या गावामध्ये महाविद्यालयाच्या वतीने ‘वृक्ष दान-दत्तक अभियान’ राबविण्यात आले आहे. याअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत कार्यालय, बामणी यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण नऊ एकरमध्ये वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचे संतुलन साधण्यात आले आहे. तसे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आणखी 20 एकर जुन्या बामणी गावातील ओसाड जमिनीवर वृक्षारोपण करण्यात येत आहे. वृक्ष दान-दत्तक अभियानांतर्गत रो.से.या. विभागाकडून 45 हजार रु. रोख व अनेक रोपे दत्तक रुपाने प्राप्त करून त्याची लागवड व संगोपन ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रभावती बिराजदार व श्री.राजकुमार बिरादार यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 व 2023-24 मध्ये नगर परिषद, उदगीर सोबत सामंजस्य करार करून जळकोट रोडवरील सार्वजनिक स्मशानभूमी स्वचछता, वृक्षारोपण व जाणीवजागृती विषयक अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्याधिकारी शुभम क्यातमवार व इतर सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अनेक स्वयंसेवकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय शिबीरामध्ये पाठवण्यात आले आहे. याअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकलेली आहे.
- महाविद्यालयाचा सोमेश पाटील या विद्यार्थ्याची राजपथ, नवी दिल्ली येथे गणपतंत्र दिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलनासाठी (NRD) निवड झाली.
- अविनाश पाटील या विद्यार्थ्याने राज्यपाल भवनाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरामध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त केला.
- अविनाश पाटील या स्वयंसेवकाने प्रेरणा शिबीरामध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त केला.
- अविनाश पाटील याला विद्यापीठस्तरीय उत्कृष्ठ स्वयंसेवक म्हणून गौरवण्यात आले.
- डॉ.एस.डी. सावंत यांनी नागपूर व मुंबई याठिकाणी संपन्न राज्यस्तरीय आव्हान शिबीरामध्ये संघव्यवस्थापक म्हणून कार्य केले.
- प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी पुणे व कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आव्हान शिबीरामध्ये संघव्यवस्थापक म्हणून कार्य केले.
- डॉ.ए.एस. टेकाळे यांनी अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय आव्हान शिबीरामध्ये संघव्यवस्थापक म्हणून कार्य केले.
- डॉ.एल.एच. पाटील, डॉ.बी.पी. बिरादार व प्रा.हरिभाऊ जाधव यांच्या कार्यकाळात मौजे कोदळी गावास निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला.
- डॉ.ए.एम. पाटील, प्रा.आर.टी. जाधव व प्रा.आर.एस. शिंदे यांच्या कार्यकाळात सिंधीकामठ येथे मांजरा नदीवर पुल बांधण्यात आला. त्या कामामुळे विद्यापीठाला पुरस्कार मिळाला व विद्यापीठाच्या तसेच ग्रामस्थांच्या प्रस्तावानुसार मांजरा नदीवर महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा ब्रीज कम बॅरेज बांधण्यात आले.